!doctype>
बुधवार, 10 मई 2023
तुम्हांला तुमच्या मुलांसोबत जगायचं आहे ना? -भाऊ चासकर, अकोले
तुम्हांला तुमच्या मुलांसोबत जगायचं आहे ना?
अकरावी-बारावीच्या वर्गात(विशेषत: खासगी क्लासेसमध्ये) दाखल केलेल्या मुलांच्या आई वडलांच्या पालकत्वाची सध्या खऱ्या अर्थानं कसोटी लागते आहे. अलीकडे बहुसंख्य पालक मुलांना दहावीनंतर खासगी क्लासेसमध्ये घालतात. आपण इतका खर्च करतो तर मग आपल्या मुलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर तरी व्हावं किंवा IIT/NIT अशा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून इंजिनीअर तरी व्हावं असं वाटतं. ही दोनच क्षेत्रं पालक आणि मुलांना महत्त्वाची वाटतात. मात्र राष्ट्रीय पातळीवरील जीवघेणी स्पर्धा असूनही अशाप्रकारे अवास्तव अपेक्षा करताना बहुसंख्य पालक आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा, त्यांचा कल कुठं आहे याचा विचार करताना दिसत नाहीत. असा विचार करायला नको? आपण आपल्या मुलांना कुठं ढकलत आहोत, याचं थोडं तरी भान ठेवायला हवं. अलीकडे मुलं हट्टी बनली आहेत. ती पालकांचं ऐकत नाहीत. मुलं लहान आहेत अजून. म्हणूनच त्यांना धोके लक्षात आणून दिले पाहिजेत.
JEEसारखी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा मुलांचा दम घेते. दरवर्षी २० लाखांहून अधिक मुलं JEE मेन्स देतात. त्यातले दोन सव्वादोन लाख मुलं अॅडव्हांससाठी पात्र होतात. पैकी ४० हजार मुलं निवडले जातात. पैकी अवघ्या १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश आयआयटीमध्ये मिळतो! बाकी मुलांना NIT, ट्रीपल IT महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. सक्सेस रेट किती आहे? अवघे दोन टक्के! बाकीच्या किती मुलांच्या स्वप्नांचा आशाआकांक्षांचा चुराडा होतो.
नुकतीच NEET ची परीक्षा झाली. भारतभरातली २० लाख ८७ हजार मुलं बसली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५३ हजार मुलं सामावून घेतले जातील. निवडयादीत आपलं नाव असायला हवं असं सगळ्याच मुलांना आणि पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु अशी अजिबात शक्यता नसते. मर्यादित जागा आणि प्रचंड मोठ्या संख्येने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणारे विद्यार्थी... हे अत्यंत विषम आणि मन विदीर्ण करणारे विदारक आणि भीषण वास्तव नजरेआड कसे काय करता येईल?
तितक्या ताकदीचं शालेय शिक्षण मिळालं नसेल, विविध विषयांमधल्या संकल्पनाच स्पष्ट नसतील तर अशा कठोर स्पर्धा परीक्षा अनेक मुलांना झेपतच नाहीत. त्या वाटेला न गेलेलं बरं. हे कोण कोणाला सांगणार? केवळ दहावीत पाठांतर करून भरपूर मार्क्स मिळाले आहेत, म्हणून अव्वाच्या सव्वा अपेक्षा वाढत जातात. कोटा, लातूरसारख्या क्लासेस फॅक्टरीमध्ये मुलं नेऊन घातली की लाखांत पैसे भरले की मुलांनी मार्क्स मशीन म्हणून भरपूर मार्क्स मिळवावेत आणि नाव गाजवावे, अशी अनेकांची अपेक्षा असते. नोकरी, उद्योग, व्यवसायातून पैसे कमावलेले असतात. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या निकषात आधी इंग्लिश मीडिअम स्कूल येते आणि मग पुढं लाखांत पैसे उकळणारे हे असे खासगी क्लासेस... मुलं कोणत्या शाळेत, कोणत्या क्लासमध्ये शिकताय हे स्टेट्स सिम्बॉल बनलं आहे जणू हे सगळं. पैसे गुंतवणूक आणि आयआयटी आणि NEET क्रॅक करून परतावा हवा असतो. असं कुठं असतं का शिक्षणात?
आधी नमूद केल्यानुसार JEE, NEET या राष्ट्रीय पातळीवरील जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जायला लावणाऱ्या कठोरात कठोर असलेल्या स्पर्धा परीक्षा बहुसंख्य मुलांना झेपतच नाहीत. पालक मात्र स्वप्न रंगवत मोठ्या अपेक्षा बाळगून असतात. स्वप्न बघणं चुकीचं नाही मात्र त्याला वास्तवाचं भान हवं.
१. घराबाहेर असलेली मुलं दिवसभर नेमकं काय करतात?
२. मुलांच्या मनात काय सुरु आहे? त्यांचा मनोव्यापार काय, कसा सुरू आहे? मनातल्या गोष्टी मुलं शेअर करतात का?
३. पोरांना अभ्यास झेतपोय का? शैक्षणिक ओव्हरलोड (दडपण) येत आहे का?
४. टेस्टमध्ये मिळालेल्या कमी अधिक मार्कांना मुलं नेमका कसा प्रतिसाद देतात?
५. दोन वर्षे अभ्यास एके अभ्यास करावा लागतो. जणू मुलांसाठी बाकी जगाशी नातं तुटलेलं असतं. मन, मेंदू आणि शरीर शिणून जात असणार. शिवाय अपेक्षांचं ओझं आणि त्यातून आलेला असह्य ताण असतोच. क्लास आणि रुमबाहेर पडून मुलं हास्यविनोद करत गप्पा मारतात का? धावायला चालायला जातात का? खेळ खेळतात का? एखादं चित्र काढतात का? संगीत ऐकतात का?
६. मुलं पुरेशी झोप/ विश्रांती घेतात का?
७. त्यांचा स्क्रीनटाइम किती आहे?
८. डाएट (जेवण) आणि नैराश्याचं जवळचं नातं असतं असं मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं पोटभर जेवण करतात का?
९. त्यांचा हॅपिनेस इंडेक्स शाबूत आहे का? त्यांना समुपदेशनाची गरज तर नाही ना? संभाव्य ‘अपयशाला‘ सामोरं जाण्याची मानसिक तयारी नसेल तर मात्र कुटुंबातला सीन बिकट बनत जातो. गृहकलह सुरू होतात. ब्लेम गेम सुरू होतात. विचित्र उदासीचं विकट मळभ दाटून येतं... आनंद हरवतो.
परवा NEETची परीक्षा झाली. अपेक्षित मार्क्स न मिळण्याच्या भीतीनं माझ्या माहितीतील काही मुलं ताणात आणि त्रासात आहेत. वर डोकं काढायला क्लासेस फॅक्टरी मुलांना घडीची उसंत देत नाही. शिकवायचं कमी अन टेस्टच जास्त! शंभर पोरांना एकाच वेळी शिकवून मोकळं व्हायचं. जो विषय विचार समजलेला नाहीये, त्यावर आधारित कठोर परीक्षा घेतली जाते. हे किती अमानुष आहे. बरं यात गंभीर विनोद असा की, NEET आणि JEE आणि CET अशा सगळ्या परीक्षा मुलं देऊन बघतात! कुठं जमतंय का? कल्पना करा. या सगळ्यात मुलांचं काय होत असेल? याचं त्यांना घंटा काही पडलेलं नाहीये. अतिरिक्त अकादमीक ताणाशी कसं डील करायचं? हे मुलांना उमजत नाही. अनेक पालकांना मुलांचं मन जाणून त्यांच्याशी संवाद साधायचं कौशल्य आत्मसात नसतं. अशा वेळी गुंतागुंत वाढत जाते. पालकांना दोष द्यायचा उद्देश नाही. काही मुलांच्या स्वतःकडून अपेक्षा वाढलेल्या असतात. पिअर्स प्रेशर असतं. शाळा आणि महाविद्यालयांच्या तसेच क्लासेसच्या कॅम्पसमध्ये समुपदेशक आवश्यक नव्हे, अनिवार्य आहेत.... मानसिक आरोग्याकडे शिक्षक, पालक यांनी कमालीचं अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. अनेक मुलांना त्रास होतो आहे. सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी स्थिती आहे. दाबून किती दिवस ठेवणार? त्रास वाढत जातो उलट.
तेव्हा पालकांनो,
वेळीच सावध व्हा. सावध ऐका पुढल्या हाका. ही स्पर्धा असणार आहेच. मात्र त्याकडे बघायची आपली आणि आपल्या मुलांची दृष्टी आणि भूमिका नीट असावी लागेल. NEET आणि JEE म्हणजेच डॉक्टर आणि इंजिनीअर यांच्या पुढे मागे करिअरची अनेक क्षेत्रं आहेत. हे नजरअंदाज करू नये. बेरोजगारी चरमसीमेवर पोहोचली आहे. भारतीय युवकांमध्ये असलेले नैराश्य मोठी समस्या बनून उभी राहिली आहे. काहीतरी करून जगण्यापुरते पैसे कमावता येतील, ‘आम्ही सोबत आहोत‘ असा विश्वास मुलांना द्यायला लागेल. कालबाह्य झाल्यात जमा असलेली शिक्षण व्यवस्था केवळ प्रमाणपत्र देते. हातात कौशल्य देऊन जगायला, आयुष्यात स्वतः च्या पायावर उभं रहायला लायक बनवत नाही... मुलांसाठी हे जग कुरूप आणि विद्रूप बनवलं आहे आधीच्या पिढ्यांनी. भोगायला मुलांना लागते आहे...
जेमतेम चाळीस किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता असलेल्या माणसाला शंभर किलोग्रॅम वजन उचलायला सांगण्यात काही अर्थ नाही. हेच करतो आहोत आपण. त्याच्याने अनर्थ झाले आहेत, होतील. तूर्त इतकेच. शेवटी असं आहे की आपल्याला आपल्या मुलांसोबत जगायचं आहे, अमानुषपणाने वागवणाऱ्या बाजारात आपण आपल्या मुलांना किती ढकलत न्यायचं याचं तारतम्य बाळगावं लागेल.
- भाऊ चासकर, अकोले
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें