प्रति,
मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे
तथा
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद पुणे
विषय - वाबळेवाडी शाळेस पुणे जिल्हा परिषदेच्या जोखडातून मुक्त करून स्वायत्तता देणे बाबत…
अर्जदार - समस्त वाबळेवाडी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती शाळा, वाबळेवाडी (ता.शिरूर), पुणे
महोदय,
वाबळेवाडी शाळेसंदर्भात सद्यस्थितीत राजकारणाने प्रेरित होऊन आपण घेतलेले निर्णय शाळेप्रती आपला द्वेषभाव दर्शवत आहे.
काही वर्षांपूर्वी म्हणजेच अगदी सन २०१२ मध्ये मोडकळीला आलेल्या दोन वर्गखोल्या व चौतीस मुले शिकत असलेल्या वाबळेवाडीची शाळा आज आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि महाराष्ट्र सरकारने तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात पथदर्शी शाळा म्हणून शाळेचा गौरव राज्याच्या अर्थसंकल्पात करीत असतानाच सद्यस्थितीत सुमारे सातशे मुले इथे शिक्षण घेत आहेत. या सर्व परिवर्तनामध्ये आम्ही ग्रामस्थांनी केलेला लोकसहभाग कारणीभूत आहे हे सर्वश्रुत व ब्रम्हसत्य आहे.
आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पामध्ये वाबळेवाडी शाळेचा सहभाग करून घेताना मागील सरकारच्या काळात तत्कालीन प्रशासनाने आम्हाला सांगितले होते की, शासन तुम्हाला एक रुपयाही देणार नाही. तुम्हाला लोकसहभागातूनच तुमची शाळा उभी करावी लागेल असे मान्य असेल तरच आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा आपल्याला देऊ. त्यांनी तसे लेखी हमीपत्र आमच्याकडून लोणावळ्याच्या आंतरराष्ट्रीय शाळा निवड कार्यशाळेमध्ये लिहून घेतलेले होते. त्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही सर्वजण तनमनधनाने शाळेच्या कामात सहभागी झालेलो आहोत आणि आजिवन राहणार आहोत.
- आम्ही आमच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी शाळेसाठी उपलब्ध करून दिल्या.
- काही सामाजिक संस्थांच्या मदतीने इमारती उभ्या केल्या.
- मुलांना शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ग्रामस्थांच्या व पालकांच्या आर्थिक योगदानातून उभ्या केल्या.
- मुलांना भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षक आम्ही लोकसहभागातून मानधन देऊन नेमून त्यांच्या माध्यमातून मिळालेले यशही दाखवून दिले.
- आम्ही आमच्या मुलांसाठी अभ्यासक्रमाबरोबर रोबोटिक्स, फाउंडेशन कोर्स, कोडींग क्लास, अविष्कार प्रयोगशाळा, परदेशी भाषा शिक्षण, तंत्रज्ञान विभाग, संगीत शिक्षण आदी अनेक प्रकारचे शिक्षण मुलांसाठी उपलब्ध करुन दिले.
- अंगणवाडीच्या मुलांना चांगले मार्गदर्शन मिळण्यासाठी आवश्यक अतिरिक्त शिक्षकांचीही आम्ही नेमणूक केलीय.
- आमच्या शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा मागील आठ वर्षाचा निकाल 100% लागलेला आहे.
- इतक्या मोठ्या झालेल्या शाळेचा मेंटेनन्स खर्चही आमचे आम्हीच ग्रामस्थ सांभाळत आहोत.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फक्त नावाला जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या या शाळेसाठी जिल्हा परिषदने नेमके काय केले हेही आम्ही आपल्याला सांगतो.
पटसंख्या वाढ सुरु झाल्यापासून आजपर्यंत जिल्हा परिषदेने कधीही मंजूर शिक्षक संखेएवढी शिक्षक संख्या पुरवली नाही. चार वर्षांपूर्वी तर सातवीपर्यंतचे वर्ग दोनशे चोवीस मुले आणि शिक्षक दोनच होते. आजही आवश्यक शिक्षक संख्येपेक्षा चार शिक्षक कमीच आहेत.
शाळा इमारत बांधून द्यावी म्हणून आत्तापर्यंत अनेकदा मागणी केली परंतु शाळेला एकही वर्गखोली जिल्हा परिषदेने कधी दिली नाही अथवा त्यांना द्यावीशीही वाटली नाही.
बांधकाम म्हणून आज पर्यंत जिल्हा परिषदेने फक्त दोन मूताऱ्यांचे संडास आणि दहा बाय दहाचे स्वयंपाकघर इतकेच दातृत्व वाबळेवाडी शाळेसाठी दाखवलेले आहे.
आम्ही इमारत बांधल्यानंतर तिला कंपाउंड करण्याची जिल्हा परिषदेकडे मागणी केली असता तीही आपल्याला पूर्ण करता आली नाही.
वाबळेवाडी च्या अंगणवाडीमध्ये आजूबाजूच्या वीस-पंचवीस गावातून मुले येत आहेत. अंगणवाडीतील मुलांची गुणवत्ता आश्चर्यचकीत करणारी आहे. एकूण अंगणवाडीतील मुलांची संख्या 185 असून जिल्हा परिषदेच्या मार्फत फक्त एकच अंगणवाडी सेविका कार्यरत आहे आहे. इतक्या मुलांना एक शिक्षिका कसे शिकवू शकेल याचा विचार आज पर्यंत तुमच्या डोक्यात आला नाही.
आम्ही शाळेमध्ये राबवत असलेल्या भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेमध्ये तुमचा कधीही सक्रीय वाटा-योगदान व सहभाग आम्हाला आपल्याकडून दिला गेला नाही.
राज्य पातळीवर व देशपातळीवर वाबळेवाडी शाळेच्या नावाने मानसन्मान घेताना, आपण वाबळेवाडी शाळेसाठी काहीच करत नाही याचे शल्यच तुमच्या मनात राहिलेय असेच आम्हाला आजपर्यंत दिसलेले नाही.
या अत्यंत सापत्न भावाच्या पार्श्वभूमीवर आज कुणाच्या तरी इगोला सांभाळत असताना वाबळेवाडी शाळेवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करताना आपण जे धाडस दाखविलेय ते आम्हा सर्व ग्रामस्थांसाठी आम्ही आव्हान समजतो. कारण ज्यांच्या दबावाने आपण निर्णय घेतलाय त्या तीन जिल्हा परिषद सदस्या आणि एक शिरुरच्या सभापतीबाई आमच्या शाळेत कधी आल्याच नाहीत हे विचारणेही आपल्याला शाळेच्या हितासाठी वाटले नाही?
1. जुलै 2021 मध्ये आमच्या शाळेबद्दल परगावातील एका व्यक्तीला एका पुढा-याने त्याच्या मुलीचे ऍडमिशन दुसरीकडे अगोदरच महिन्यापूर्वी झालेले असताना वाबळेवाडी शाळेत प्रवेश घेण्याच्या निमित्ताने पाठवले व शाळेवर तक्रार द्यायला लावली.
2. तालुक्याचा शिक्षण विभाग अस्तित्वात असताना चौकशी करण्यासाठी स्वतः बीडिओ पळत पळत आले. शाळेची कोणतीही कागदपत्रे न पाहताच शाळेत आर्थिक अनियमितता असल्याचा प्राथमिक अहवाल देऊन मोकळे झाले.
3. अहवाल दिल्यानंतर सहा दिवसांनी बीडीओंनी शाळेला तपासणीसाठी कागदपत्रे मागितली. त्यानंतर शाळेने चार दिवसांनी त्यांना कागदपत्रे दिली.
4. आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, चौकशी समिती या सर्वांना दिलेल्या लेखी खुलासामध्ये ओरडून सांगतोय की, आर्थिक व्यवहार आम्ही ग्रामस्थ सांभाळत आहोत, त्याच्याशी शाळेचा कोणताही संबंध नाही. पण या सगळ्यांनी शाळेला बदनाम करायचे ठरवून काम चालू ठेवलेले आहे. विनाकारण मुख्याध्यापक व शिक्षकांना या प्रकरणात ओढून तुम्हाला फक्त आमच्या शाळेची बदनामीच अपेक्षित होती असा आमचा आपल्याबद्दलचा अनुभव आहे. वास्तविक पाहता आम्ही वाबळेवाडी ग्रामस्थांच्या सभेच्या निर्णयाद्वारे आमच्या गाव पातळीवर आठ प्रामाणिक व जबाबदार ग्रामस्थांची निवड करून त्यांच्या शाळा सुधार समितीची निर्मिती करून आर्थिक व भौतिक कामे पाहण्यासाठी त्यांना नियुक्त केलेले आहे व शिक्षकांनी फक्त गुणवत्तेवर काम करावे कोणत्याही परिस्थितीत आर्थिक व भौतिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करू नये असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. याबाबत आम्ही शासनस्तरापासून समाजापर्यंत सर्वांना स्पष्टपणे सांगितलेले आहे.
5. आम्ही आमचे पैसे आमच्या पातळीवर आमच्या मुलांच्या हितासाठी खर्च करत आहोत. आमचा एकही रुपया शाळेकडे ठेवायलाही दिला जात नाही, तर खर्चासाठी दूरच. आमच्या मुलांच्या भवितव्याच्या साठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही आमचे पैसे शाळेच्या विकासासाठी वापरतोय यासाठी आमचे आभार मानायचे सोडून आपण चक्क आमच्याच चौकशा सुरू करुन गुरुजींनाच निलंबीत करण्यासाठी धजावलात.
6. साधारण फक्त दहा टक्के पालक आपापल्या स्वेच्छेने व क्षमतेनुसार लोकसहभागात आर्थिक अथवा वस्तू रूपाने योगदान देतात व इतर 90 टक्के विद्यार्थी मोफत लाभार्थी म्हणून त्याचा उपभोग घेतात.
7. आमच्या एकाही पालकाची अथवा ग्रामस्थांची याबाबत कसलीच तक्रार नाही. कारण आम्ही सगळे मिळूनच अत्यंत पारदर्शकपणे आमचा आर्थिक व्यवहार करत आहोत व त्यातून आमच्याच मुलांचे हित साधले जातेय हे सगळ्यांना माहीत आहे.
8. तुम्ही आम्हाला कोणताही पत्रव्यवहार केलेला नसतानाही आम्ही स्वतःहून आमचे ग्रामस्थांचे लोकसहभागाचे सर्व विनियोग अभिलेखे लेखापरीक्षण अहवालासहीत तुम्हाला तपासणीकामी दिलेले आहेत. त्याबाबतचा अहवाल ग्रामस्थांना देण्याची तुमची आज पर्यंत तरी हिम्मत झाली का? की तुम्हाला कागदोपत्री अहवाल आम्हाला द्यायचाच नाही फक्त आमच्या शाळेची बदनामीच करायची आहे का? पैसे आमचेच... विनियोग करणारे आम्हीच... मग आमच्या पैशात आम्हीच भ्रष्टाचार करतो का? आता आम्हालाही विचारावेसे वाटत आहे की, जिल्हा परिषदेचे डोके ठिकाणावर आहे का?...
किती गंमत आहे पहा… आमच्या बाबळेवाडी शाळेचा सर्व आर्थिक व्यवहार आम्हा ग्रामस्थांकडे आहे, आणि तुम्ही दोषी धरून कारवाई करताय शिक्षकांवर… असे षंढासारखे त्यांच्या आड का दडता? आम्ही तुम्हाला हिशेब दिला आहे व पाहिजे असेल तर अजूनही देतो, आमच्या समोर उभे राहून हिशेब घेण्याची तुमच्यात हिम्मत नाही का? चौकशी समितीने आम्हाला अहवाल द्यावा म्हणून आम्ही जिल्हा परिषदेत येऊन आंदोलन केले तरीही आपण आम्हाला आजपर्यंत अहवाल दिलेला नाही. शाळेला जे पत्र पाठवले त्यात निष्काळजीपणा केला... कामात कूचराई केली... हलगर्जीपणा केला... कर्तव्यात कसूर केली असे... थातूरमातूर व थिल्लर आरोप लिहिलेले आहेत. असे बिनबुडाचे व मोघम आरोप सांगून आपण बहुमताच्या जोरावर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत एका अति उत्कृष्ट शाळेला बदनाम करण्यासाठी शिक्षकाच्या निलंबनाचा ठराव घेता. अरे, अरे काय दिवस आले तुमच्यावर?...
9. भ्रष्टाचार करणारे तर तुम्ही आहात… सर्व पदाधिकारी व अधिकारी आकंठ भ्रष्टाचारात बुडालेले आहात, आणि आमच्या सारख्या शाळा उभारणीचे पवित्र काम करणाऱ्या ग्रामस्थांवर आणि शिक्षकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता याची तुम्हाला लाज वाटत नाही का? सत्याला व प्रामाणिकपणाला न्याय मिळेल या आशेने समंजसपणे आम्ही तुमच्याबरोबर वागत आलो त्याचा अर्थ आम्ही मूर्ख आहोत असा आपण घेतलाय हेच तुमचे विचारस्तर.
10. वरील सर्व बाबी आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच चौकशी समिती यांना अनेक वेळा लेखी खुलाशामधून पण सांगितलेल्या आहेत. अशा सर्व कागदपत्रांच्या पोहोच आमच्याकडे उपलब्ध आहेत. मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांना व प्रशासनाला राजकीय व्यक्ती चालवत असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे आमची बाजू कोणीही समजून न घेता जाणीवपूर्वक आमच्या शाळेची बदनामी केली जात आहे.
11. गलिच्छ राजकारणाच्या नादाला लागून तुम्ही पार वेडे झालेला आहात. वाबळेवाडी च्या शाळेतून उभे राहिलेले प्रयोग आज महाराष्ट्रभर वापरले जात आहेत. राज्यातल्या नव्हे तर देशातल्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणे शक्य आहे हे सिद्ध करून दाखवणारी वाबळेवाडी शाळा उद्ध्वस्त करून तुम्ही लाखो मुलांचे नुकसान करत आहात हे तुमच्या लक्षात येत नाही.
या सर्व प्रकारांमधून नऊ वर्षे प्रामाणिकपणे काम करत असणारे आम्ही ग्रामस्थ, अत्यंत तळमळीने केवळ नोकरी न करता सेवाभावाने काम करीत असणारे सर्व शिक्षक व वाबळेवाडी शाळेमध्ये नाविन्यपूर्ण पद्धतीने विकसित झालेल्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेत असणारे आमचे विद्यार्थी हे सर्वजण अत्यंत विचलित झालेले आहेत. आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी हे अतिशय घातक आहे. मुलांच्या होणाऱ्या नुकसानासाठी जिल्हा परिषद पूर्णपणे जबाबदार आहे.
आम्ही वाबळेवाडी चे ग्रामस्थ तुमच्यावर स्पष्टपणे असा आरोप करतो की, वाबळेवाडी शाळेच्या उभारणी मध्ये तुमचा काडीचाही सहभाग नसताना केवळ वाबळेवाडी शाळा उद्ध्वस्त करण्यातच तुम्हाला रस आहे. यासाठी जबाबदार असणार्या पुढार्यांच्या टोळीसह प्रशासनानेही वाबळेवाडी शाळेच्या प्रगतीने व इतर मराठी माध्यमाच्या सरकारी शाळा त्याच रस्त्याने वाटचाल करू लागल्याने भयग्रस्त झालेल्या खाजगी शाळा चालकांकडून वाबळेवाडीची शाळा उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतलेली आहे.
तुमची नियत चांगली असती तर गेले पाच महिने वाबळेवाडी शाळेतील मुलांचे जे नुकसान होत आहे त्याबाबत तुम्ही मदत करणे तर सोडाच निदान चौकशी तरी केली असती. तसे आपणाकडून काहीही झालेले नाही.
आज आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या वाबळेवाडी च्या शाळेला दिलेली कोट्यावधी किमतीची जमीन आमची आहे… आर्ट ऑफ लिविंग च्या सोबतीने निर्माण झालेली इमारत आमची आहे… शाळेत आज मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध असणारी प्रत्येक वस्तू आम्ही ग्रामस्थांनी खरेदी केलेली आहे…तुमचे इथे आहे काय?... तुमचे सरकारी साडेअकरा शिक्षक शाळेवर आहेत, पण त्याच्या अपरोक्ष आम्ही ग्रामस्थांनी लोकसहभागातून नेमलेले 16 शिक्षक शाळेत काम करत आहेत… आमचे ग्रामस्थ व पालक रोज आपली स्वतःची शाळा समजून येथे काही ना काही पडेल ते काम करत आहेत… आम्ही सर्वांनी मिळून आमच्या शाळेत आमच्या मुलांसाठी नंदनवन फुलवले आहे… त्या नंदनवनात जिल्हा परिषदेच्या अतृप्त अपप्रवृत्तींचा हैदोस सुरू झालेला आहे.
तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणा शिकवणार काय?... आम्ही खेडेगावची सरळ साधी माणसं, प्रामाणिकपणा आमच्या रक्तातच आहे. म्हणून तर वाबळेवाडी सारखी शाळा आम्ही शिक्षकांच्या मदतीने उभी करून दाखवली. तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे पदे आहेत मग मागील इतक्या वर्षात तुम्ही काय दिवे लावले आणि कोणत्या शाळा उभ्या केल्या याचे एकदा आत्मपरीक्षण करा… अरे निदान तुम्हाला उभा करता येत नसेल तर आमच्या सारख्या लोकांनी उभी केलेली कामे उध्वस्त करण्याचे पाप तरी करू नका. कुठे फेडाल ही पापं…
आता तुम्हाला आमचा कोपरापासून नमस्कार… तुमच्यासारख्या लायक नसलेल्या व्यवस्थेवर आमचा काडीचाही विश्वास उरलेला नाही. तुमच्या व्यवस्थेच्या आधारावर आम्ही आमची भावी पिढी सोपवू शकत नाही. सरकारी व्यवस्थेला आमच्यासारख्या गोरगरिबांच्या मुलांचे काहीही पडलेले नाही हेच तुम्ही आपल्या चौकशी-कारवाई पध्दतीने सिद्ध केले आहे. त्यामुळे यापुढे आम्हाला आमच्या मुलांना घडविण्यासाठी चे स्वातंत्र्य हवे आहे. आपल्या देशामध्ये कनिष्ठ व उच्च शिक्षणामध्ये स्वायत्ततेचा प्रयोग यशस्वी झालेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही स्वायत्ततेचा पर्याय असला पाहिजे यासाठी सर्वात योग्य उदाहरण म्हणून वाबळेवाडीची शाळा आहे. आम्ही स्वायत्त प्राथमिक शाळा म्हणून देशातला पहिला प्रयोग यशस्वी करून दाखवू शकतो.
एकतर तुम्ही आम्हाला आमची मुले आमच्या पद्धतीने घटनेच्या चौकटीत राहून शिकविण्याची स्वायत्तता द्या... अन्यथा आमच्या वाबळेवाडीतून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे हटवा. आमच्या जमिनी आणि इमारती खाली करा. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या मुलांना शिकविण्याची सोय करतो… तुमच्यासारख्या बरबटलेल्या, भंगार, संवेदनाशून्य, दूरदृष्टीहीन, ढेपाळलेल्या, नीती शून्य, टोळी अंकित, व्यवस्थेबरोबर आता आम्हाला आमच्या मुलांना ठेवायचे नाही. कारण त्यात आमच्या मुलांचे नुकसानच होईल अशी आमची खात्री झालेली आहे.
अजून एक सांगतो यांला विनंती समजू नका… आम्हाला आमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी स्वायत्ततेची संधी द्या अन्यथा हा विषय घेऊन आम्ही उच्च न्यायालयातही जाऊ शकतो.
धन्यवाद,
समस्त ग्रामस्थ, वाबळेवाडीकर, ता.शिरूर, पुणे
सर्वच आदरणीय वाबळेवाडी ग्रामस्थ बंधु भगिनींना सस्नेह वंदन..
जवाब देंहटाएं